रायगड किल्ला १९ जानेवारी २००७

शनिवारी १३ जानेवारीला दुपारी ३ वा. ता. आम्ही दोघ (पूनम आणि मी) आमच्या अल्टोमध्ये ठाण्याहून निघालो. पूनमने गाडीतच घोरायला सुरुवात केली. पनवेलपेण मार्गे जातांना रस्ता चांगला असल्याने गाडी चालवायला मजा येत होती. साडे पाचच्या सुमारास माणगावच्या अलीकडे छोट्याशा गावात भेळ खायला थांबलो. तेथूनच पाचाडच्या देशमुखांना फोने लावला. राहण्याची व जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे केली. पुन्हा प्रवास सुरु केला. खरं तर माणगाव व तेथून रायगड – पाचाड असे जायचे आम्ही ठरवले होते, परंतु गप्पांच्या ओघात आम्ही पुढे निघून गेलो. मग पुढे महाडला येवून पाचाडला निघालो. हा रस्ता एकदा आल्यामुळे माहित होता. आम्ही माणगाव मार्गे आलो नाही तेच बर केलं असं वाटून गेलं कारण त्या मार्गाने वाहतूक कमी व रस्ताही खराब होता. महाडमार्गे असलेला रस्ता मस्त वळणा वळणाचा होता. .१५ ला पाचाडला पोहोचलो. येथील देशमुखांचे हॉटेल गिर्यारोहाकांमध्ये लोकप्रिय आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा संपूर्ण देशमुख कुटुंब प्रचंड गडबडीत होते, औरंगाबादच्या एका शाळेची सहल अआलेली होती व त्यांची जेवणाची तयारी चाललेली होती. आम्ही प्रवासाने थकलो होतो म्हणून फ्रेश होऊन जरावेळ आडवे झालो. पूनमने तर एक स्माल पेग झोपही घेतली. मी पुण्याच्या आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकरानी लिहिलेलं (संशोधित) ‘चला पाहूया रायगडपुस्तक वाचत बसलो. रात्री ११.३० ला आमची जेवणाची तयारी झाली, भूक लागल्याने पटापट जेवून घेतलं आणि आजूबाजूचा अंधार निरखित बसलो. कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी पाहते ६ वा. ता. निघायचा बेत होता, पण जागच ६ वा. ता. आली. लवकर आटोपून गड चढायला सुरुवात केली. आम्ही अगोदर जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा रोपवेने गडावर गेलो होतो. त्यावेळेस संपूर्ण गड फिरून बघितला होता. त्यामुळे आता फक्त हा गड पायी चढायचा होता. पूनम हे करू शकेल कि नाही हि शंकाही होतीच. तरी म्हटलं जेवढ आणि जसं जमेल तसं चढत राहू या. आता गडाच्या ३/४ भागा पर्यंत गाडीने जाता येते. तेथ पर्यंत पोहोचलो, गाडी पार्क केली, आणि हर हर महादेव……..३० ला गड चढायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला एकदम छातीवर पायऱ्या लागतात आणि आपण पहिल्याच फटक्यात प्रचंड दमतो. यानंतर साधारण २ तास थांबत, बसत, चालत, बोलत प्रवास सुरु होता. गडाच्या पूर्वेला रायगडवाडी आहे (पूर्वी हि गडाची बाजारपेठ होती), पश्चिमेला पाचाड गावं आहे. गडामुळे या गावाचे वातावरण नेहमी उबदार असते म्हणूनच जिजाबाई येथे वाड्यात राहात असत असे सांगतात. पूर्वदक्षिण भागात लिंगाणा किल्ला आहे, तर उत्तरेला कोकणकडा. गडावर चढताना सर्व बाजूला नजर फिरवली तर मोठमोठे डोंगरच दिसतात.

उजव्या बाजूला उंच कडा व डावीकडे खोल दरी ठेऊन हि चढण चढावी लागते. मध्ये मध्ये दहीवाले, ताकवाले, कोकण सरबर विकणारे गावकरी तुमचा थकवा घालवायला मदत करीत असतात. चार साडे चार तासांच्या या थकवणाऱ्या वाटचाली नंतर आम्ही गडावर पोहोचलो. हो २७०० फुट उंच अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत आम्ही पायी पोहोचलो. काय आनंद झाला म्हणून सांगू. एवढेच बस होते आम्हाला. आता गड फिरायची इच्छा नव्हती (आणि ताकदही). महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला शिर्काई देवीचे छोटेशे मंदिर आहे. त्या काळात हि गडावरील मुख्य देवता होती. तिचे दर्शन घेतले, सावली बघून मस्त गप्पा मारीत बसलो. भूक लागली होती पण परत चालत जायचे होते म्हणून जेवण टाळले आणि परत हा राजांचा गड उतरायला लागलो. येतांना वाटेत काकडी, बोरे असे काहीबाही खाल्ले. उतरताना वेळ कमी लागला. गाडी पर्यंत आल्यावर मात्र प्रचंड भूक लागली होती, तेथीलच एका हॉटेल मध्ये जेवलो आणि परतीला लागलो.

पुस्तक परीक्षण मुंबई ते काश्मीर

20150114_195108लेखक: अरुण वेढीकर

प्रकाशन: ग्रंथाली

किं. ४०० रुपये

एकदाच ताजमहाल सारखी कलाकृती निर्माण करावी व स्वता: बरोबरच त्या कलाकृतीचा आस्वाद घेणार्यांना तृप्त करावं असं काहीसं अरुण वेढीकर यांच्या बाबतीत म्हणावसं वाटतं. त्यांच्या मुंबई ते काश्मीर सायकलसफरया पुस्तकाच्या वाचनानंतर प्रत्येक वाचकाची अशीच काहीशी प्रतिक्रिया उमटणार.

१९७० दशकाच्या अखेरीस आपल्याकडे (भारतात) दुचाकी/चारचाकी गाड्यांचे प्रमाण अतिशय कमी होते व सर्वांसाठी सायकलहेच वाहतुकीचे सर्वमान्य साधन होते. अशा वेळेस विशीचा एक कलावंत तरुण सायकलवरून मुंबई ते काश्मीरअशा प्रवासाचे स्वप्न बघतो, ते जगतो, काश्मीरमध्ये तब्बल वर्षभर राहतो आणि आपली त्या अनुभवावर एक सुंदर प्रवास वर्णनात्मक पुस्तक लिहितो.

असं सगळंचं धाडसी आणि अद्भूत.

खरं तर प्रत्येकाला असेच काहीतरी धाडस करायचे असते पण……काहीना काही कारणामुळे ते पूर्ण होवू शकत नाही२१व्या शतकात जिथे प्रवास हा विमानवेगाकडून प्रकाशवेगाकडे झपाट्याने चाललेला आहे तिथे सायकल चालवून मिळणारा आनंद हा कलावंत वृत्तीच्या व्यक्तींनाच समजतो. विशेषतः ४० ते ६० या वयोगटातील मंडळींनी असा आनंद पुष्कळ घेतला असेल.

त्या काळात सामाजिक किंवा वैयक्तित धनसंचय या कारणासाठी पाचपाच, दहादहा दिवस सायकलवर एका कनातीत गोल गोल फिरणारे तरुण मुलं कित्येकांना आजही आठवत असेल. अशी तरुण मुले त्याकाळी विशेष कौतुकास पात्र होत असे कारण लोकांना ते कामही अशक्य कोटीतले वाटत असे.

त्याच काळात कामाच्या रोजच्या धबडग्याला कंटाळून आपणही काहीतरी वेगळे करावे असे स्वप्न अरुणनावाच्या या मुलाने बघितले. या काहीतरी वेगळ्या कामाची निवड त्याच्या पूर्वीच्या भटक्या स्वभावाला अनुसरुनच त्याने केली.

घरच्यांचा विरोध पत्करून, आपल्या जुन्या समविचारी मित्रांच्या मदतीने, प्रवासाची योग्य काळजी घेत त्याने १३ एप्रिल १९७९ च्या भल्या पाहते सायकलच्या पेन्डल्वर जे पाउल ठेवले ते काश्मीरच्या भूमीवर गेल्यावरच थांबले. या मनोहारी प्रवासात जे लाखमोलाचे क्षण त्याने एकट्याने अनुभवले, ते शब्दबद्ध करून पुस्तकरूपाने आपल्यालासमोर मांडले आहे.

स्वतः असे काहीही करू न करू शकलेले असंख्य वाचक आपल्या स्वपानापुर्तीचा आनंद यातून मिळवू शकतील, तसेच आगामी काळात असेच काहीतरी भन्नाट करू इच्छिणारे वाचक यांना हे पुस्तक मार्गदर्शक धरू शकते असे मला खात्रीने वाटते.

या प्रवासाच्या सुरुवातीलाच साधलेल्या संवादापासून हा आनंद, प्रस्तावना (प्रवीण दवणे) – आभार प्रवासाची तयारी त्रासबोध प्रत्यक्ष प्रवास काश्मीर तेथील वास्तव्य व परतीचा प्रवास असा चढत्या भाजणीचा आहे. कलाकार वृत्ती, अलंकारित भाषा सौंदर्य, कवित्व, चित्रकला, सौंदर्यदृष्टी, परिक्षण व तरुण वयातील निर्भीड जगण्याची मौज अशा लेखकाच्या गुणवैशिष्ट्यांचा एकत्रित अविष्कार आपल्याला या प्रवासात जागोजागी जाणवतो.

लेखकाने आपल्या रसनातृप्तीच्या मस्तीत अलंकारित भाषेची टाकसाळचं येथे उघडली आहे कि काय असे वाटावे इतका त्यांचा वापर केलेला आहे. कदाचित काही वाचकांना त्याचे अजीर्णही होवू शकेल.

उदाहरणार्थ

वर काळ्या शाईने भरलेलं एखादंघंघाळ भरून वाहात राहावं तसं अमावास्येच्या काळोखानं गच्च भरलेलं आकाश ओसंडून चाललं होतं.”

भयाण शुकशुकाट पाठीवर लादून बोचरा वारा थंडपणे वाहात होता. ”

पळभर का होईना आधुनिक विचारांची शिंग संस्कृतीच्या नाळेत जाऊन अडकलीच. “

अजाणतेपणी विषमिश्रित अन्न भराभर ग्रहण करावं तद्वत, मी निसर्गाचं आकंठ पान करीत होतो. “

अद्याप दिनकररावांचा पत्ता नव्हता….तरीसुद्धा दूरवर त्यांची काही छचोर किरणं धवल

शिखारांशी खेळत होते. “

लेखक स्वतः चित्रकार असल्यामुळे त्यांना भावलेल्या स्थळांचे, व्यक्तींचे यथायोग्य चित्र, नकाशे त्यांनी या प्रवासात काढलेले आहे. तसेच रंगीत छायाचित्रही आपल्याला त्या त्या स्थळांचा आनंद देतात. वेगवेगळ्या ठिकाणाचे वैशिष्ट्यपूर्ण जेवण, तेथील चालीरीती, लोकांचे स्वभाव याविषयी आपल्या ज्ञानात भरच पडत जाते.

लेखकाने आपल्या प्रवासातल्या प्रत्येक क्षणांचे इतके विस्तृतपणे वर्णन केलेले आहे कि त्यांनी अनुभवलेला तो क्षण आपणही वाचतांना अनुभवतो. आपल्याला माहित असलेल्या नाशिक मालेगाव धुळे सेंधवा इंदूर शरण्ग्पूर चंबळ ग्वाल्हेर आग्रा मथुरा दिल्ली पठाणकोट जम्मू या शहरांबरोबरच त्यांच्या दरम्यान असलेली लहान मोठी शहरे किंवा गावे यां विषयी देखील बरीचशी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे.

ग्वाल्हेर शहरा जवळची घाटी, चंबळ नदीच्या खोऱ्यातील प्रकरणे हे तर विशेष आहेतच, परंतु ग्वाल्हेर शहर व तेथील किल्ला, दिल्ली शहर याबद्दलही बरीच पाने खर्च केलेली आहेत. आग्र्याच्या ताजमहाला बाबतची स्वतःची बेधडक मतेही ते बिनधास्तपणे मांडतांना दिसतात.

आपल्या आवडत्या या प्रवासामध्ये दोन दोन ओळींच्या काव्यपंक्तीही लेखकाला प्रसंगानुरूप वेळोवेळी सुचत गेल्याजशा

माणसात आणि पक्ष्यात फारसं अंतर नसावं

परस्परांच्या कामावरून बारसं झालं असावं

 

कुंभमेळ्याचं कारण पुण्य पदरी पडावं

कि मानसाचं मरण चेंगराचेंगरीत घडावं

 

आपलंच आहे म्हणताना आमचं सरकार झोपलं

उठलं तोवर आमचं काश्मीर शेजार्यानं लुटलं

 

तरुण वयात असलेलं तरुण्यासुलभ आकर्षण अतिशय मखमली शब्दात मांडण्याचे कसब अरुणयांना साध्य झालेले आहे. तरुणीच्या सौंदर्याची प्रसंशा करताना स्वतःच्या मनाची झालेली अवस्था अनुरूप शब्दरचनेत बसवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

काश्मीरमधील ललना‘ (स्त्रीपुराण) तर वाचायलाच हवे. काश्मीरमधील सुंदर तरुणी, त्यांच्यातील झालेले संवाद, मेहेंदी काढतांना आलेले नाजूक अनुभव असे विविध प्रसंग नेमके मांडलेले आहेत. अर्थात त्या तरुणींची काढलेली व्यक्तिचित्रे आपल्याला बघायला मिळणार नाहीत, तरुणींच्या लीलांनी घायाळ झालेल्या लेखकाने त्या चित्रांना स्वतःच्या नकळतपणे ती त्यांनाच देऊन टाकली आहेत.

३९० पानांच्या या पुस्तकाला ग्रंथालीनेदोन वेळेस प्रकाशित केल्यानंतर लेखक अरुण वेढीकर ग्राफिक आर्टीस्टया कलेच्या क्षेत्रात आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ३५ वर्षांपूर्वी घडलेलली ती अतिशय रोमांचकारी सायकल सफर प्रकाशित झाल्यानंतर वेळोवेळी मिळालेला वाचकांचा प्रतिसाद आजही अखंडपणे चालू आहे असे ते सांगतात. माझ्या आयुष्याची ती सफरहि मुद्दल आहे व वाचकांचा कडू गोड प्रतिसाद हे मला मिळणारे उर्जारुपी व्याज आहे असे ते प्रामाणिकपणे कबूल करतात.